कोल्हापूर – शौचालयाचे बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशनची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत सदस्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. महादेव डोंगळे (ग्रामविकास अधिकारी, कुर्डू, ता. करवीर), धनाजी पाटील (ग्रामपंचायत सदस्य, कुर्डू ग्रामपंचायत) अशी लाच घेताना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार यांना कुर्डू गावातील 2 लाख 99 हजाराचे सार्वजनिक शौचालय बांधणेचे काम करवीर पंचायत समितीकडून मिळाले होते. त्यांना या कामाचे बिल पंचायत समितीकडून 2 लाख 10 हजार, तर ग्रामपंचायतीकडून 89 हजार रुपये मिळणार होते. मंजूर रकमेपैकी तक्रारदारांना 1 लाख 97 हजार मिळाले होते, तर उर्वरित रक्कम कुर्डू ग्रामपंचायतीकडून मिळणार होती. हे बिल मंजूर करण्यासाठी डोंगळे आणि पाटील यांनी 10 टक्के कमिशनची (30 हजार) लाच मागितली. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुपचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानंतर वाशी परिसरात डोंगळेला 5 हजारांची रक्कम घेताना सापळा लावून रंगेहाथ पकडण्यात आले. तर पाटीलला हळदी (ता. करवीर) येथे सापळा लावून 25 हजार रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले.