नगर – नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटीच्या केडगाव शाखेमध्ये आतापर्यंत सव्वा दोन किलो बनावट सोने आढळल्याने खळबळ उडाली आहे. बनावट सोन्यामुळे 76 लाख 41 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. आणखी शंभर खाती संशयास्पद असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शहर सहकारी बॅंके पाठोपाठ नागेबाबा मल्टिस्टेटमध्ये बनावट सोने आढळल्याने खातेदारांत खळबळ उडाली असून, अनेक खातेदार चौकशीच्या भितीने फरार झाले आहेत.
शहर सहकारी बॅंकेत बनावट सोने आढळल्याने याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात साडेतीन कोटीचे बनावट सोने आढळून आले होते. आरोपीकडे नागेबाबा मल्टिस्टेटच्या पावत्या सापडल्या होत्या. कोतवाली पोलिसांनी केलेल्या तपासात नागेबाबा मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडीट सोसायटीत सुरुवातीला 2 लाख 78 हजारांचे बनावट सोने आढळून आले होते. याप्रकरणी “नागेबाबा मल्टीस्टेट’चे केडगाव शाखेचे शाखाधिकारी अनिल देशमुख यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोल्ड व्हॅल्यूअर अजय कपालेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. काही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांनी केडगाव येथील शाखेत दुसऱ्या गोल्ड व्हॅल्यूअरमार्फत अन्य खात्यांची तपासणी केली. आतापर्यंत 15 खाती तपासली असून, 2 हजार 321 ग्रॅम बनावट सोने आढळले आहे. त्यातून 76 लाख 41 रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींची संख्या 15 पर्यंत गेली आहे. अजूनही शंभर खाती संशयास्पद असून, त्याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे.
शहर सहकारी बॅंकेत साडेतीन कोटी रुपयांचे बनावट सोने सापडले होते. त्यापाठोपाठ नागेबाबा मल्टीस्टेटमध्ये सव्वा दोन किलो सोने बनावट निघाल्याने खातेदारांत खळबळ उडाली आहे. अजूनही बनावट सोने सापडल्यास हा आकडा वाढणार आहे.