बोपखेल, दि. 24 (वार्ताहर) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल (इंग्रजी माध्यम) शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन शाळांमध्ये स्थान मिळाले आहे. जगातील सर्वोत्तम शाळांच्या यादीत या शाळेचा समावेश झाला आहे. पहिल्या 3 शाळांमध्ये स्थान मिळवणारी देशातील ही पहिलीच महापालिकेची शाळा ठरणार आहे.
टी. फोर. एज्युकेशन या संस्थेच्या वतीने जागतिकस्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. त्यात शाळांनी घेतलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन शिक्षणासह समाजासाठी उत्तम काम करणाऱ्या जगभरातील शाळांचा सन्मान केला जातो. याचा निकाल गुरुवारी (दि. 22) जाहीर झाला. महापालिकेच्या बोपखेल शाळेला “सामुदाय सहयोग’ (वस्ती सहभाग) या विषयासाठी हे नामांकन जाहीर झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची ही शाळा आकांक्षा फाउंडेशनतर्फे चालवली जाते.
“टी फोर एज्युकेशन’ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत हजारो शाळांनी अर्ज दाखल केले होते. या निकालादरम्यान शाळेत महापालिका शिक्षण मंडळ उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, विजय वावरे, माजी उपमहापौर हिराबाई घुले, आकांक्षा फाउंडेशन चे सी.ओ.ओ. राहुल गुप्ता, शिवकामी कोटला, जयश्री ओबेरॉय, निखिल एकबोटे, शाळेचे मुख्याध्यापिका सुषमा पठारे, अर्चना जाधव, कमलेश चव्हाण उपस्थित होते.
आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
बोपखेलच्या या महापालिकेच्या शाळेत बिकट परिस्थिती असलेल्या मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. त्यामुळे पहिल्यापासूनच पालकांचा सहभाग अधिक ठेवण्याचा प्रयत्न शाळेच्या वतीने केला. मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग असेल, तर शिक्षण घेणे मुलांना सोयीस्कर जाते. याच विचाराने पालकांचा शाळेत सहभाग वाढवला. या उपक्रमाचा कोविड काळात खूप फायदा झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
पालक सभेचे आयोजन
दर महिन्याला विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी पालकांची बैठक घेतली जाते. तसेच पालकांच्या शाळा व्यवस्थापन समिती, विद्या समिती, परिवहन समिती, पोषण आहार समिती अशा समित्या स्थापन केल्या. पालकांचा सक्रिय सहभाग हळूहळू वाढू लागला. जवळच्या परिसरातील वस्त्यांमधील मुले शाळेत येतात. या शाळेत 316 विद्यार्थी आहेत. ज्यूनिअर केजीपासून सहावीपर्यंत मुलांना शिक्षण दिले जाते.