राज्य शासनाच्या आदेशाची महापालिकेला प्रतीक्षा
पुणे – महापालिका निवडणुका मुदतीत न झाल्याने पालिकेवर 15 मार्च 2022 पासून पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्तीची सहा महिन्यांची मुदत उद्या (बुधवारी) रात्री 12 वाजता संपुष्टात येत आहे. त्यातच, राज्यात सत्ताबदलानंतर अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू असल्याने महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून मुदतवाढ मिळणार की त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासकाच्या बाबतीत शासनाकडून महापालिकेस कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बुधवारीच याबाबत शासनाकडून कळविले जाईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे, पुणे महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर प्रमुख महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका मुदतीत झालेल्या नाहीत. महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीनंतर अस्तित्वात आलेली पालिका सदस्यांची मुदत 14 मार्च 2022 मध्ये मध्यरात्री संपुष्टात आली. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार, राज्यशासनाकडून महापालिकेच्या कारभाराची जबाबदारी पालिका आयुक्तांकडे कायम ठेवत त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली.
ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी होती. ही मुदत बुधवारी संपत आहे. त्यातच, राज्य मंत्रिमंडळात सोमवारी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदांच्या प्रशासकांची मुदतवाढ करण्याचा निर्णय झालेला असला तरी पालिकांच्या प्रशासकांबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नगरविकास विभागाकडून महापालिकेस प्रशासक मुदतवाढीबाबत काहीच कळविण्यात आलेले नव्हते.
राज्यात बदल्यांचे वारे…
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरू आहे. महिन्याभरापूर्वीच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची बदली झाली असून पुणे महापालिका आयुक्तांचीही बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच, आता प्रशासक कालावधी संपत असल्याने आयुक्तांची बदलीही केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानंतरच आयुक्त पुण्यातच राहणार की नवीन प्रशासक येणार हे स्पष्ट होणार आहे.