पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने अचानकच शहरातील अनेक विसर्जन घाट बंद केले. यामुळे गणेशभक्तांना कृत्रिम हौदात विसर्जन करावे लागले तर काहींनी मूर्तीदान केले. नदीतील पाणी पातळीत वाढ झाल्याने विसर्जन घाट बंद केल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
चिंचवड येथील घाट, रावेत येथील बंधारा तर निगडीतील गणेश तलाव सर्वच ठिकाणी प्रशासनाकडून थेट पाण्यात विसर्जन करण्यास बंदी करण्यात आली. बॅरिकेड्स लावून घाट बंद करण्यात आले होते. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. चिंचवड येथे सकाळपासूनच बॅरिकेड्स लावून घाट बंद करण्यात आला होता. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, बंदी घातली नसून काही कारणांमुळे पर्यायी व्यवस्था केली आहे.
धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. घाटाच्या पायऱ्यांवरही पाणी आले आहे. ही धोकादायक स्थिती पाहता घाट बंद करुन कृत्रिम हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रावेत बंधारा येथून शहराला पाणी पुरवठा होतो. येथील पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी याठिकाणी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करण्यात आला आहे.
काही ठिकाणी सशुल्क व्यवस्था
चिंचवड केशवनगर येथील घाटावर एका होडीतून नदीत मूर्ती विसर्जित करण्यात येत होत्या परंतु ही व्यवस्था सशुल्क असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
रावेत येथील बंधाऱ्यातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच पवना व मुळा नदीत पाणीच्या पातळी वाढल्याने काही ठिकाणच्या घाटांवर धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्या घाटांवर विसर्जन न करू देता कृत्रिम हौदाची व्यवस्था करुन देण्यात आली आहे.
– किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
चिंचवड ः बरिकेड्स लावून घाट बंद करण्यात आला आहे.
केशवनगर चिंचवड ः होडीतून विर्सजनासाठी सशुल्क व्यवस्था
रावेत ः गणेश तलावाजवळ कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.