मॉस्को – तत्कालिन सोव्हिएत रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांना आज शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. शीतयुद्ध समाप्त करण्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी रशियामध्ये अभूतपूर्व सुधारणा घडवून आणल्या होत्या. मात्र त्यांच्याच कार्यकाळात सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. त्यामुळे गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्वाचे कौतुक होण्याऐवजी त्यांच्यावर टीकाच अधिक झाली होती.
विद्यमान अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यविधीला अनुपस्थित राहिले होते. तसेच गोर्बाचेव्ह यांच्या दफनविधीच्या समारंभाला सरकारी इतमामाचे मान देखील देण्यात आला नव्हता. यातून रशियाच्या या महान नेत्याला अखेरच्या क्षणी अवहेलना झेलावी लागल्याचे चित्र उभे राहिले.
गुरुवारी पुतीन यांनी मॉस्कोतील रुग्णालयात जाऊन गुपचूपपणे गोर्बाचेव्ह ( former Soviet leader Mikhail Gorbachev) यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आपली आदरांजली अर्पण केली. मात्र खूप व्यस्त असल्यामुळे अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांच्या दफनविधाला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे क्रेमलीनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
गोर्बाचेव्ह यांचे मंगळवारी मॉस्कोतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. मॉस्कोतील पीलर हॉल येथील दफनभूमीत त्यांच्या पत्नी राईसा यांच्या थडग्याशेजारीच गोर्बाचेव्ह यांनादेखील दफन केले गेले. 18 व्या शतकापासून क्रेमलीनशी संबंधित सर्व प्रमुख नेत्यांचा दफनविधी याच दफनभूमीत झाला आहे.
अंत्ययात्रेच्यावेळी गोर्बाचेव्ह यांची कन्या एरिना आणि त्यांच्या दोन नाती या गोर्बाचेव्ह यांच्या शवपेटीशेजारीच बसलेल्या होत्या. गोर्बाचेव्ह यांना सरकारी इतमामात अखेरचा निरोप का दिला गेला नाही, याचे समाधानकारक उत्तर सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळू शकले नाही.