पुणे/बारामती, दि. 1 (प्रतिनिधी) -बारामती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. निवडीनंतरच्या त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांना पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. मोरे यांनीही कामाचा सपाटा सुरू केला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी गाव तिथे शाखा निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बारामतीसह जिल्ह्यातील विविध मतदारसंघात पक्ष संघटना वाढीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, याची जबाबदारी वसंत मोरे यांच्यावर देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सरचिटणीस मोरे हे बारामतीच्या दौऱ्यावर आले होते. श्री मयूरेश्वर तसेच मार्तंड मल्हार देवस्थानाचे दर्शन व अभिषेक त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर आयोजित मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
गाव तिथे शाखा ही संकल्पना बारामती मतदारसंघात यशस्वीपणे राबवण्याचा मनोदय मोरे यांनी व्यक्त केला, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका मनसे लढणार असून त्याची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेच्या राज्य उपाध्यक्षपदी सुधीर पाटसकर तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून विनोद जावळे ही दोन्हीही महत्त्वाची पदे बारामतीकडे सोपविण्यात आलेली आहेत.
राज ठाकरे लवकरच बारामती दौऱ्यावर
सरचिटणीस वसंत मोरे यांची बारामती मतदारसंघावर पक्ष निरीक्षक म्हणून निवड केल्यानंतर मनसेचे अध्यक्ष स्वतः राज ठाकरे देखील मतदारसंघाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच येत्या काही दिवसात राज ठाकरे यांचा बारामती दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोरे यांनी सांगितले.