मुंबई ( cm eknath shinde meets raj thackeray ) – मनसे पदाधिकाऱ्याने एका वयोवृद्ध महिलेला कानशिलात लगावून धक्का देत पाडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे मनसे पदाधिकाऱ्याने वयोवृद्ध महिलेला मारहाण केल्याच्या घटनेवर संनताप व्यक्त केला जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणेशोस्तवानिमित्ताने पोहोचले आहेत.
नेमका काय आहे व्हिडीओ?
गणेशोस्तवासाठी रोवण्यात आलेल्या एका लाकडी डांबावरून हा वाद सुरु झाला. हा वाद चिघळल्याने चवताळलेल्या मनसे पदाधिकाऱ्याने वयोवृद्धेच्या कानशिलात लगावली. कानशिलात लगावल्याने वयोवृद्ध महिलेचा देखील संताप झाला व दोघांनी एकमेकांस शिवीगाळ केली. वयोवृद्ध महिला माघार घेण्यास तयार नसल्याने मनसे पदाधिकारी तिला धक्का देऊन पडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. हा व्हिडीओ २८ तारखेचा असून तो सोशल मीडियावर आज (गुरुवारी) व्हायरल झाला आहे. ही घटना मुंबईतील मुंबा देवी परिसरातील असून मारहाण झालेल्या महिलेचे नाव प्रकाश देवी असल्याची माहिती आहे.
मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव विनोद अरगिले असून तो मनसेचा उपविभाग प्रमुख असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पक्षातर्फे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला भरदिवसा केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचले आहेत. महिलेला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट विरोधकांच्या निशाण्यावर येण्याची शक्यता आहे. ( cm eknath shinde meets raj thackeray )
संजय राठोड प्रकरणावरून नामुष्की
यापूर्वी, एकनाथ शिंदे समर्थक असलेल्या संजय राठोड यांच्यावर पूजा चाव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने विरोधकांनी भाजप व शिंदे गटाला चांगलंच घेरलं होत. महाविकास आघाडी सत्तेत असताना राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला ते आता मंत्रिमंडळात कसे चालतात असा जाब विरोधकांनी विचारला होता.