श्रीगोंदा (समीरण नागवडे) – एका महिलेसोबत नाशिकहून श्रीगोंद्यात आलेला पर्शियन ‘बोका’ श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारातून पसार झाला. या बोक्याच्या शोधार्थ पोलीसही चार तास राबले, मात्र त्या बोक्याचा शोध काही लागला नाही. येथील पोलिसांच्या लसीकरणासाठी एक चमू आज (दि.१९) नाशिकहून चारचाकीने श्रीगोंद्यात आला होता. त्या चमूतील एका महिलेने ‘टुटू’ नावाचा पर्शियन बोका आपल्या सोबत आणला होता. तोही तब्बल पासष्ट हजारांचा. पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू असताना तो बोका महिलेकडील पिंजऱ्यातून पसार झाला.
आपला ‘टुटू’ हरवल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने व तिच्या सहकाऱ्यांनी दुपारी एक वाजेच्या सुमारास ‘टुटू’ची शोधमोहीम सुरू केली. मात्र ‘टुटू’ न सापडल्याने त्या महिलेने ही बाब श्रीगोंदा पोलिसांच्या कानावर घातली. पासष्ट हजारांचा बोका आहे तरी कसा याच्या कुतूहलापोटी पोलीसही ‘टुटू’च्या शोधमोहिमेत सहभागी झाले. ‘टुटू’च्या शोधार्थ पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात आले. मात्र चार तासांच्या शोधमोहिमेनंतरही ‘टुटू’चा शोध लागू शकला नाही. अखेर त्या महिलेने ‘टुटू’चे खाद्यही पोलीस ठाण्यात सोडत जड अंतकरणाने पुढील प्रवास करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत प्राणी अभ्यासकांनी सांगितले की, एरव्ही बंदिस्त राहण्याची सवय असलेला बोका सहजासहजी पिंजऱ्यातून बाहेर पडणार नाही. सध्या प्राण्यांचा विणीचा हंगाम सुरू आहे. तो बोका एखाद्या मांजरीला भाळून तिच्या मागे गेला असावा. अन्यथा एखादे भक्ष्य समोर दिसल्यानंतर ‘किलिंग इन्स्टिंक्ट’ जागा होऊन तो शिकारीच्या मागे जाऊ शकतो.
दरम्यान, एरव्ही गुन्हा दाखल होऊनही ‘ऍक्शन मोड’वर न येणारे पोलीस आज एका ‘बोक्याच्या’ शोधासाठी विना फिर्यादीचे चार तास राबल्याने त्याची पोलीस ठाण्याच्या आवारात चर्चा रंगली होती. पोलिसांनी अशीच तत्परता अन्य गुन्ह्यांच्या तपासात दाखविल्यास एकही गुन्हा प्रलंबित राहणार नाही.