जळोची – बारामती शहरातील श्रीरामनगर येथे एका 47 वर्षीय व्यक्तीवर तिघांनी धार धार शस्त्राने खून केल्याची घटना गुरूवारी (दि. 18) घडली. या हल्ल्यात शशिकांत बाबासो कारंडे (वय 47, रा. भिगवण रस्ता बारामती, मूळ रा. मठाचीवाडी ता. फलटण जि. सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सायंकाळी मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी गेलेल्या शशिकांत कारंडे यांच्यावर कुऱ्हाड व सत्तूराने तिघांनी वार करत त्यांचा खून केला होता. भरदिवसा घडलेल्या घटनेनंतर बारामतीत खळबळ उडाली होती. अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी काही तासातच आरोपींना ताब्यात घेतले.
खून झालेल्या शशिकांत यांच्या मुलाशी यापूर्वी यातील एका मुलाशी भांडण झाले होते. त्यात कारंडे यांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी त्यावेळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. मुलीशी बोलणे व चॅटींग करण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. प्रेमामध्ये तो अडथळा आणतो, असा समज त्या मुलांचा झाला होता. त्यातून त्यांनी कारंडे याच्यावर हल्ला चढवला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. परंतु ते अल्पवयीन असल्याने जामिनावर सुटले. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी खून प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीने कारंडे यांच्या मुलाला उद्देशून… आबाद रहे ना रहे लेकीन कब्रस्थान उनको जरूर बनाएंगे, फिक्स बिग शॉट.. असे स्टेटसही ठेवले होते.
खून झालेल्या शशिकांत यांनी ते स्टेटस पाहून आपल्या मुलाला सावध केले होते. तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकतो. मागील प्रकरणानंतर त्याने या अल्पवयींनांशी संबंध ठेवणे बंद केले होते. शशिकांत यांनी जुने घर बदलत नवीन ठिकाणी राहायला जाणे पसंत केले होते. शिवाय भांडणे करू नका, असा वडीलकीचा सल्ला शशिकांत यांनी दिला होता. मुलगा हाती येत नसल्याने त्याच्या ऐवजी त्याच्या वडिलांचा काटा या अल्पवयीनांनी काढला.