नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार भारतीय बाजारात शुक्रवारी सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ वाढ झाली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 594 रुपयांनी वाढून 50,341 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 998 रुपयांनी वाढून 55,164 रुपये प्रति किलो झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारामध्ये सोन्याचा दर वाढून 1,718 डॉलर व चांदीचा दर 18.81 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर डॉलर काहीसा कमकुवत झाला आहे. त्यामुळे काही गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.
मात्र जोपर्यंत रशिया- युक्रेन युद्ध संपत नाही आणि अमेरिकेची व्याजदर वाढ संपत नाही तोपर्यंत सोने आणि चांदीचे दर स्थिर होण्याची शक्यता त्यांनी नाकारली. भारताने सोन्याची आयात कमी व्हावी याकरिता सोन्यावर आयात शुल्क वाढविले आहे. त्यामुळे जागतिक दराच्या तुलनेत भारतातील सोन्याचे दर काही प्रमाणात जास्त आहेत. आयात शुल्क कमी करावे अशी मागणी भारतातील दागिने उत्पादकांनी केली आहे. कारण त्यामुळे सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका वाढतो असे सांगण्यात आले.