लंडन – इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू व नुकताच कसोटी संघाचा कर्णधार बनलेल्या बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटला रामराम केला आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहिर केले. भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा पराभव झाल्यावर चोवीस तासांच्या आतच स्टोक्सने हा धक्कादायक निर्णय जाहिर केला.
❤️🏴 pic.twitter.com/xTS5oNfN2j
— Ben Stokes (@benstokes38) July 18, 2022
स्टोक्स कसोटी आणि टी-20 खेळत राहणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातही त्याचा इंग्लंड संघात समावेश होऊ शकतो. स्टोक्स हा कसोटीत इंग्लंडचा कर्णधार आहे.
2019 च्या वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड संघाचा भाग
2019 मध्ये इंग्लंड संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यामध्ये बेन स्टोक्सचा समावेश होता. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये बेन स्टोक्सच्या बॅटने ओव्हरथ्रोमध्ये चौकार मारला होता. शेवटी हा चौकारच इंग्लंडच्या विजयाचे कारण ठरला.
31 वर्षीय स्टोक्सने आतापर्यंत 104 एकदिवसीय सामन्यांच्या 89 डावांमध्ये 2 हजार 919 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 39.45 आणि स्ट्राइक रेट 95.27 इतका आहे. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 102 आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 3 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत.
त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने 87 डावात 74 बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6.03 होता. गोलंदाजीत त्याची सर्वोत्तम कामगिरी 61 धावांत पाच विकेट अशी आहे. त्याने कारकिर्दीत एकदाच एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.