रैनाने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली आहे. (Suresh Raina retires from all forms of cricket including Indian Premier League) त्याने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि जवळपास दोन वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट आणि T20 लीगलाही अलविदा केला आहे.
नवी दिल्ली – भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता रैना आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार नाही. रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंग धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. यानंतर त्याची आयपीएलमधील कामगिरी खूपच निराशाजनक झाली. या कारणास्तव, आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही.
आता रैनानेही आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटला अलविदा केला आहे. सुरेश रैना हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे आणि त्याला मिस्टर आयपीएल म्हणूनही ओळखले जात होते. मात्र, नंतर त्याचा फॉर्म खराब झाला आणि रैना या स्पर्धेतही संघर्ष करताना दिसला.
सुरेश रैनाने आपल्या निवृत्तीची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. त्याने ट्विट करून लिहिले आहे की, “माझ्या देशाचे आणि माझे राज्य उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू इच्छितो. मी बीसीसीआय, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज, राजीव शुक्ला सर आणि मी माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.”
It has been an absolute honour to represent my country & state UP. I would like to announce my retirement from all formats of Cricket. I would like to thank @BCCI, @UPCACricket, @ChennaiIPL, @ShuklaRajiv sir & all my fans for their support and unwavering faith in my abilities 🇮🇳
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) September 6, 2022
सुरेश रैनाने त्याचा आवडता कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. रैनाने यामागे अनेक कारणे दिली होती. एका मीडिया संस्थेशी बोलताना तो म्हणाला होता की, आम्ही 15 ऑगस्टला निवृत्त होण्याची योजना आधीच केली होती. धोनीच्या जर्सीचा क्रमांक 7 आणि माझा 3 आहे. हे एकत्र करून 73 होतात. 15 ऑगस्ट 2020 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे यापेक्षा चांगला दिवस असूच शकला नसता.
रैना म्हणला होता की, धोनीने 23 डिसेंबर (2004) बांगलादेशविरुद्ध चितगावमध्ये करिअरची सुरुवात केली, तर मी 30 जुलै (2005) श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. आम्ही दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ एकत्र सुरुवात केली, सीएसकेमध्ये एकत्र राहिलो आणि आता आम्ही एकत्र निवृत्ती घेतली.
भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज
रैनाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले. रैनाच्या नावावर एका शतकासह कसोटीत 768 धावा आहेत. 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये रैनाने पाच शतकांच्या मदतीने 5615 धावा केल्या. त्याचवेळी रैनाने 78 टी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी 1604 धावा केल्या. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी रैना एक आहे.
आयपीएलमध्ये रैनाच्या नावावर अनेक विक्रम
आयपीएलमध्ये सुरेश रैनाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने प्लेऑफमध्ये सर्वाधिक धावा (714), सर्वाधिक षटकार (40), सर्वाधिक चौकार (51) सर्वाधिक अर्धशतक (7) जलद अर्धशतक (16 चेंडू) आणि पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा (87 ) केल्या आहेत. आयपीएलच्या फायनल, क्वालिफायर आणि एलिमिनेटर मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.