प्रभात वृत्तसेवा, पुणे : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर प्रस्तावित केलेली जी.एस.टी दरवाढ, गॅसच्या दरात झालेली वाढ,राज्य सरकारने वीज दरात केलेली वाढ या सर्व महागाईच्या आघातांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने बालगंधर्व चौक येथे ‘महागाई विरोधी आंदोलन’ करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या आवडत्या प्रतिनिधी म्हणून गरिबी, महागाई व बेरोजगारीच्या वेशात पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख, सुरेश गुजर, अजिंक्य पालकर, समिर शेख, हेमंत बघे, सागर राजे भोसले, अमोल ननावरे, नरेश पगड्डालू, शशिकला कुंभार, प्रतिभा गायकवाड, वर्षा ढावरे, पुजा झोळे, मिना पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी बोलतान जगताप म्हणाले की, नुकतेच जी.एस.टी परिषदेत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील मूलभूत वस्तू तेल, तूप, पनीर या जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी वाढवण्याची तरतूद केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होत आहे की अगदी मूलभूत जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी लागल्यानंतर या गोष्टी महाग होणार आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किमतीत देखील तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून होत असणारी ही जनतेची लूट थांबावी जनतेला आपले जीवन सुसह्य कराचे अशी टिका यावेळी करण्यात आली.