भोपाळ – महाराष्ट्राप्रमाणेच मध्यप्रदेशातील शिंदेंनाही भाजपने मुख्यमंत्री बनवायला हवे होते, असे उपहासात्मक वक्तव्य कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केले. त्यातून त्यांनी भाजपबरोबरच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना डिवचले.
भाजपने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. तर, त्या पदाचे दावेदार असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले. ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पण, त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही.
खरेतर, भाजपने ज्योतिरादित्य यांना मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना उपमुख्यमंत्री करायला हवे होते. दोन्ही राज्यांमधील घडामोडींतून भाजपची दुहेरी वर्तणूक उघड होते, अशी शाब्दिक टोलेबाजी दिग्विजय यांनी मध्यप्रदेशातील एका सभेत बोलताना केली.
ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्यप्रदेशात मार्च 2020 मध्ये सत्ताबदल झाला. ज्योतिरादित्य आणि त्यांच्या काही समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसचे सरकार कोसळले. त्यानंतर चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. नंतर ज्योतिरादित्य यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.