मुंबई – मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना एक पत्र पाठवून ही धमकी दिली असून हे पत्र रायगडहून आल्याचे प्राथमिक तपासात समजते. तसेच या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेल्या आहेत. या पत्रातून किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली असून जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. तसेच, सरकार पडू देत मग बघुन घेऊ, असा उल्लेखही करण्यात आला आहे. महत्त्वाची आणि खळबळजनक बाब म्हणजे, अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, सध्या राज्यातील सत्तापेच रंगलेला असताना धमकीच्या पत्रात करण्यात आलेल्या अजित पवारांच्या उल्लेखामुळे खळबळ माजली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना करोनाची लागण झाली असून ते क्वॉरंटाईन आहेत.