नवी दिल्ली -ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे हेलिकॉप्टर मंगळवारी समुद्रात कोसळले. त्या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर पाच जणांना वाचवण्यात यश आले.
ओएनजीसीच्या पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबई किनारपट्टीपासून सुमारे 50 सागरी मैल अंतरावर असणाऱ्या सागर किरण या कंपनीच्या तेल प्रकल्पाच्या दिशेने उड्डाण केले. त्या प्रकल्पापासून अवघ्या 1 सागरी मैल अंतरावर असताना ते हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले. ती दुर्घटना घडली त्यावेळी हेलिकॉप्टरमधून 2 पायलट आणि 7 कर्मचारी मिळून 9 जण प्रवास करत होते.
समुद्रात कोसळल्यानंतर हेलिकॉप्टर त्याला जोडण्यात आलेल्या फ्लोटर्समुळे पाण्यावर तरंगत राहिले. दुर्घटनेची माहिती समजताच ओएनजीसी आणि नौदलाची जहाजे बचाव पथकांसह धाडण्यात आली. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर पाण्यावर तरंगत असल्याने बचाव पथकांना त्यातून सर्वांना बाहेर काढण्यात यश आले.
हेलिकॉप्टरमधील चौघांची शुद्ध हरपली असल्याने त्यांना तातडीने नौदलाच्या हेलिकॉप्टरने मुंबईतील रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा जीव वाचू शकला नाही. मृतांपैकी तिघे ओएनजीसीचे कर्मचारी होते. तर, चौथा त्या कंपनीच्या कंत्राटदारासाठी काम करत होता. हेलिकॉप्टर कोसळण्यामागचे नेमके कारण तातडीने समजू शकले नाही.