रायगड – कर्जत ते नेरळ रोडवर डिकसळ येथे कार आणि रिक्षा यांच्या झालेल्या भीषण अपघातानंतर अचानक स्फोट झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत-नेरळ मार्गावर कार आणि रिक्षा यांच्यात धडक झाली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला. या आगीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कर्जत ते नेरळ रोडवरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तसेच घटनास्थळी लागलीच अग्निशामक दलाला बोलावण्यात आले. यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु आगीत रिक्षा आणि कारच्या धडकेनंतर स्फोट झाला आणि दोन्ही वाहने पूर्णतः जळून खाक झाली. रिक्षा आणि कारमधील एक वाहन सीएनजी असल्यानेच स्फोट होऊन दोन्ही वाहने पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.