पॅरिस – 2050 पर्यंत विविध कारणामुळे जगातील दोनशे पन्नास कोटी लोकसंख्येला बहिरेपणा येणार असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका संस्थेने काढला आहे. फ्रान्समधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अँड सायन्स या संस्थेने संशोधनानंतर आपला अहवाल जाहीर केला असून त्यामध्ये ह्या प्रकारचा इशारा देण्यात आला आहे.
ध्वनिप्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे हा बहिरेपणा येऊ शकतो असे या अहवालात म्हटले आहे. या संशोधनामध्ये 18 ते 75 या वयोगटातील 1 लाख 86 हजार लोकांचा अभ्यास करण्यात आला. फ्रान्समधील चार पैकी एका व्यक्तीला कानाची म्हणजे ऐकण्याची समस्या जाणवत आहे असे लक्षात आले. जगात सर्वत्र तशीच परिस्थिती असल्याने 25 टक्के लोकसंख्येला बहिरेपणा सतावू शकतो असे या अहवालात म्हटले आहे.
बदलती जीवनशैली सामाजिक एकाकीपणा डिप्रेशन आणि ध्वनिप्रदूषण या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्या इयरफोन आणि इतर उपकरणांचा वापर करते त्याचाही फटका बसू शकतो असा इशारा या संशोधनात देण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे सध्या जगातील 150 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्येला ऐकण्याबाबत कोणत्या ना कोणती समस्या सतावत आहे. हा आकडा 2050 पर्यंत 250 कोटी पर्यंत वाढण्याची भीती आहे. केवळ फ्रान्सचा विचार केला तर फ्रान्समधील 37 टक्के लोकांना दररोज हिअरिंग एडचा वापर करावा लागत आहे.