मुंबई – ऍट्रॉसिटी अंतर्गत अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा जामीन ठाणे न्यायलयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर केला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात 2020 साली ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्याने तिला आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी झालेल्या युक्तीवादानंतर तिला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. केतकी चितळेला ठाणे कोर्टाने दिलासा दिला असला तरीही ती तुरूंगातच राहणार आहे, कारण ती आणखी एका प्रकरणात आरोपी आहे. ज्या प्रकरणात 21 जून रोजी जामीनावर सुनावणी होणार आहे.
केतकीची उच्च न्यायालयात धाव
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्ट केल्याने केतकीवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तिच्यावर अटकेची कारवाईही करण्यात आली आहे. या प्रकरणी केतकीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगानेही देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना नोटीस पाठवली आहे.