पुणे : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणाऱ्यांना मिळकतकर सवलतीसह अन्य अनेक गोष्टींमध्ये प्राधान्य देण्याबाबतच्या पर्यायांचा “इव्ही सेल’ विचार करत आहे. “इव्ही सेल’च्या बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
“पुणे शहर इ-व्हेईकल’ सेलला मुख्यमंत्र्यांकडून विशेष मान्यता मिळाली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझी वसुंधरा पुरस्कार सोहळ्यात याविषयी ऊहापोह करण्यात आला होता. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी “इव्ही सेल’ची बुधवारी बैठक घेतली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह वाहन कंपन्यांचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे प्रतिनिधी, पीएमपीएमएल, मेट्रो, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, एमआयडीसी यासह संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत इ-व्हेईकल घेणाऱ्यांना मालमत्ता कर सवलत, इमारतींमध्ये आरक्षित जागा, रस्त्यांवरील पार्किंग प्राधान्ये, जनजागृती मोहीमख पीएमपीएमएल आणि पुणे मेट्रो यांनी एकत्रित काम करून नागरिकांना पहिल्या थांब्यापासून ते शेवटच्या थांब्यापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासंबंधीही या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात नियोजित सर्व नवीन निवासी इमारतींमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या तरतुदीसाठी अतिरिक्त वीज भार अनिवार्य करण्यावर ईव्ही सेलने एकमत केले. महावितरणने नवीन निवासी गृहनिर्माण संस्थांमध्ये ते करण्याविषयी सुचवले. सोसायट्यांमध्ये चार्जिंगसाठी स्वतंत्र मीटर बसवणे, मॉल्स, सिनेमा हॉल, रुग्णालये, विद्यापीठे, महाविद्यालये आदी नवीन आणि विद्यमान व्यावसायिक इमारती, पार्किंगच्या जागांवर काही टक्के पार्किंग स्पॉट्स आरक्षित ठेवण्याच्या तरतुदीवर चर्चा केली.
सन 2021 मध्ये, पुण्यात एकूण 6 हजार 205 “इव्ही’ची नोंदणी झाली. सन 2022 मध्ये, मेपर्यंत पुणे शहरात 8 हजार 220 “इव्ही’ नोंदणी झाली आहे. शहरातील “इव्ही’ नोंदणीला आणखी चालना देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे “इव्ही सेल’चे उद्दिष्ट आहे.
– विक्रमकुमार, आयुक्त, मनपा