नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टेलिव्हीजन चर्चेत मुस्लीम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्या विषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून कानपूर आणि काहीं ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना भाजपने आज म्हटले आहे की, आम्हाला सर्वच धर्माविषयी आदर आहे आणि आमच्या मनात कोणाही धर्म प्रमुखांचा अवमान करण्याचा हेतू नाही. भाजप अशा विपरित मते प्रदर्शित करणाऱ्यां लोकांचा किंवा त्यांच्या तत्वप्रणालीच समर्थन करीत नाही असेही आज भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
भाजपच्या या निवेदनात कोणत्याही घटनेचा अथवा कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण हे निवेदन त्याच अनुषंगाने देण्यात आले आहे असे मानले जात आहे.
भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी हे निवेदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म फुलला आणि वाढला आहे. भारतीय जनता पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो. कोणत्याही धर्मातील कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाचा अपमान करण्याच्या प्रकाराचा भाजप तीव्र निषेध करतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा कोणताही धर्म पाळण्याचा आणि प्रत्येक धर्माचा आदर व सन्मान करण्याचा अधिकार दिला आहे, असे ते म्हणाले. आम्ही भारताला एक महान देश बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत जिथे सर्व समान आहेत आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळाली पाहिजे, जिथे सर्वजण भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी वचनबद्ध आहेत, जिथे सर्वांना वाढ आणि विकासाची फळे मिळायला हवीत अशीच आमची धारणा आहे, असेही भाजप नेते अरूणसिंह यांनी म्हटले आहे.