ढाका – बांगलादेशातील एका खाजगी केमिकल कंटेनर डेपोमध्ये स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत किमान 35 जण ठार तर अन्य 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत, जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
शनिवारी रात्री चितगावमधील सीताकुंडा उपजिल्हामधील कदमरसूल परिसरातील बीएम कंटेनर डेपोत ही दुर्घटना घडली. आतापर्यंत 35 मृतदेह येथील शवागारात पोहोचले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने वार्ताहरांना सांगितले.
पंतप्रधान शेख हसीना यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांनी घटनास्थळी वैद्यकीय आणि अन्य मदत पथके पाठवली आहेत. या घटनेतील अनेक जखमी वेगवेळ्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील काही जणही मरण पावल्याचे सांगण्यात येत असून त्यांची एकत्रित माहिती संकलीत केली जात आहे.