वंदना बर्वे
नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि थिंक टॅंक डॉ. विनय सहस्रबुध्दे यांना राज्यसभेची उमदेवारी नाकारली आहे. एवढेच नव्हे तर, राज्यसभेच्या निवडणुकीनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचे प्रतिनिधीत्व करणारा एकही मुस्लिम खासदार बघायला मिळणार नाही, हे येथे उल्लेखनीय.
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी 22 उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या रिंगणात तिसरा उमेदवार उतरवून भाजपने शिवसेनेचे टेंशन वाढविले आहे तर दुसरीकडे एकाही मुस्लिम नेत्याना उमेदवारी दिलेली नाही. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचा एकही मुस्लिम खासदार बघायला मिळणार नाही, अशी चर्चा आहे.
राज्यसभेत सध्या भाजपचे तीन मुस्लिम खासदार आहेत. त्यात मुख्तार अब्बास नकवी, एम. जे. अकबर आणि जफर इस्लाम यांचा समावेश आहे. हे सर्व खासदार निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्याजागीा एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. यामुळे रामपूर लोकसभा मतदारसंघात होणाया पोटनिवडणुकीत नकवी यांना उतरविले जाणार असल्याची चर्चा आहे. भाजप पोटनिवडणूक किंवा राष्ट्रपतीनियुक्त पध्दतीच्या माध्यमातून मुस्लिम नेत्यांना सभागृहात आणणार असल्याचीही चर्चा आहे.
भाजपने थिंक टॅंक डॉ. विनय सहस्रबुध्दे, माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, ओपी माथुर, संजय सेठ, दुष्यंत गौतम आणि जयप्रकाश निषाद यांचाही पत्ता साफ केला आहे.
अशातच, महाराष्ट्राच्या रिंगणात भाजपने तिसरा उमेदवार उतरविल्यामुळे निवडणूक रोमांचक झाली आहे. सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात आता सात उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेने आधीच दोन उमदेवारांना उतरवून टेंशन वाढविले होते. यात भाजपनेही भर टाकली.