मुंबई – अभिनेता सोनू सूद हा लोकांचा ( मसिहा ) देवदूत आहे. कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत बनला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांने अनेकांसाठी मदतीचा हात पोहोचवला. तो नेहमीच मदत मागणाऱ्या लोकांसाठी धावून येतो. अशीच मदत सोनूने पुन्हा एकदा केली आहे.
सोशलवर बिहारच्या एक मुलीचा व्हिडिओ गेल्या कित्येक दिवसांपासून व्हायरल होत होता. या व्हिडिओतील मुलीला सोनुने अलीकडेच मदत केली आहे. व्हायरल व्हिडिओतील मुलगी दिव्यांग असून एका पायाने 1 किलोमीटर चालत शाळेत जात असे. जेव्हा मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सोनूने मुलीसाठी ट्विट केले.
सोनू सूदने ट्वीट केले की, ‘आता ही तिच्या एक नाही तर दोन्ही पायांवर शाळेत जाईल. तिकिट पाठवत आहे. चला आता दोन्ही पायावर चालण्याची वेळ आली आहे.’ याविषयी त्याने ट्वीट करुन माहिती दिली आहे.
सीमा गावातीलच सरकारी शाळेत शिकते. मात्र एका रस्ता अपघातात तिला एक पाय गमवावा लागला आहे. पण सीमाने तिचा संघर्ष सुरूच ठेवला. सीमाचे वडील खीरण मांझी दुसऱ्या शहरात मजूर म्हणून काम करतात आणि आई वीटभट्टीवर काम करते. सीमाला भविष्यात शिक्षिका व्हायचे आहे आणि म्हणूनच तिला मन लावून अभ्यास करायचा आहे. सीमाला ५ भावंडे आहेत. सीमाच्या मदतीसाठी राज्याचे इमारत बांधकाम मंत्री अशोक चौधरी यांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे.