सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळील तारकर्लीत पर्यटकांनी भरलेली बोट बुडाल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या बोटीतून 20 जण प्रवास करीत होते. यामधील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. उर्वरित 16 प्रवाशांचा सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे आणि मुंबई शहरातील 20 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी तारकर्ली येथे आला होता. स्कुबा डायविंगसाठी ते समुद्रात गेले होते. स्कुबा डायविंग दरम्यान तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येताना सुसाट्याचा वारा आल्याने बोटीतील प्रवासी पर्यटक सुमुद्राच्या पाण्यात कोसळले. बुडालेली बोट ही ‘जय गजानन’ नावाची आहे. बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले.
अचानक बोट बुडाल्याने घटनास्थळी आरडाओरड सुरू झाली. त्यानंतर बुडणाऱ्या पर्यटकांना सुदैवाने बाहेर काढण्यात यश आले. मात्र बोटमधील दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. इतर पर्यटकांना बाहेर काढून तातडीने मालवण्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. उपचार घेत असलेल्या पर्यटकांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने स्कुबा डायविंग सरकारकडून बंद करण्यात आली होती, मात्र तरी सुद्धा व्यावसायिक स्वत:च्या ताकतीवर डायविंग सुरू ठेवत आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.