कोलकाता – आयपीएल स्पर्धेतील बाद फेरीच्या म्हणजेच प्लेऑफच्या सामन्यांना आजपासून येथील ईडन गार्डन्स मैदानावर सुरुवात होत आहे. पहिला क्वालिफायरचा सामना बलाढ्य गुजरात टायटन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे.
यंदाच्या स्पर्धेत नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी पहिल्या स्पर्धेत प्लेऑफ गटात स्थान मिळवत आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यातही गुजरातने हार्दीक पंड्याच्या नेतृत्वात या स्पर्धेच्या साखळी फेरीत 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकत 20 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. दुसरीकडे राजस्थाननेही सुरुवातीच्या अपयशानंतरही आपला खेळ उंचावताना 9 सामने जिंकत 18 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. याच पहिल्या दोन संघात ही क्वालिफायर लढत होत आहे.
पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने सातत्यपूर्ण कामगिरी करताना स्पर्धेतील बलाढ्य संघांवर वर्चस्व राखले. राजस्थाननेही भरात असलेला जोस बटलर नंतरच्या काही सामन्यांत अपयशी ठरुनही अन्य खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर बाद फेरीत स्थान मिळवले.
या दोन संघातील लढत गोलंदाजांपेक्षाही जास्त आक्रमक फलंदाजांमध्येच पाहायला मिळणार आहे. त्यातही यंदाच्या
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बटलरकडून राजस्थानला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. त्यानेच यंदाच्या मोसमात तब्बल तीन शतके फटकावली आहेत.
दुसरीकडे गुजरातचीही फलंदाजी सशक्त आहे. खुद्द कर्णधार पंड्या चांगली कामगिरी करत आहे. तसेच त्यांची फलंदाजी भक्कम आहे.
राजस्थानला देवदत्त पडीक्कल, शेमरन हेटमायर, कर्णधार संजू सॅमसन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा व यजुवेंद्र चहल यांच्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. अष्टपैलू म्हणून यंदाच्या स्पर्धेत रवीचंद्रन अश्विनने आपली गुणवत्ता नव्याने तयार केली आहे. आजवर ऑफस्पीन गोलंदाजीतच सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या अश्विनने या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत पिंचहिटरची भूमीका सार्थपणे हाताळली आहे.
रशिद खान व बटलरकडे लक्ष
यंदाच्या स्पर्धेत फलंदाजीत सर्वाधिक धावा करत राजस्थानच्या जोस बटलरने वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र गेल्या काही सामन्यात त्याच्याकडून मोठी खेळी झालेली नाही. त्यामुळे या सामन्यात तो यशस्वी ठरला तर राजस्थानसाठी हा सामना जिंकणे सोपे ठरेल. दुसरीकडे गुजरातचा लेग स्पीन गोलंदाज रशिद खानने गोलंदाजीसह फलंदाजीतही अफलातून कामगिरी केली आहे. त्याने काही सामने तर आपल्या फलंदाजीतील क्षमतेच्या जोरावर जिंकून दिले आहेत. याच दोन खेळाडूंमधील चुरस या सामन्यात लक्षवेधी ठरणार आहे.
गुजरातबाबत बोलायचे तर त्यांचे वृद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यु वेड व डेव्हीड मिलर चांगलेच भरात आहेत. त्यातही कर्णधार पंड्याही सातत्यपूर्ण खेळी करत आहे. तळात राहुल तेवतियाने वादळी फलंदाजीचे अनेक दाखले या स्पर्धेत दिले आहेत. त्यामुळे राजस्थानच्या गोलंदाजांना सुरुवातीच्याच षटकांत त्यांच्यावर नियंत्रण मिळवावे लागमार आहे. गोलंदाजीतही त्यांचे पंड्यासह महंमद शमी, रशिद खान व लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येक लढतीत समोरच्या संघातील प्रमुख फलंदाजांना अडचमीत आणले असून या सामन्यातही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राहणार आहे.