पुणे – मोक्का प्रकरणात साडेतीन वर्षांपासून तुरूंगात असलेला विपुल बाबुराव इंगवले (रा. शुक्रवार पेठ) याला मोक्काचे विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 50 हजारांचा जामीन मंजुर केला आहे. न्यायालयात सुनावणीला हजर राहण्याच्या कारणाशिवाय एक वर्षाच्या कालावधीत पुणे शहरात प्रवेश न करण्याच्या अटींवर हा आदेश दिला आहे.
त्याने ऍड. हर्षल सुनिल पाटील आणि ऍड. एस.पी. मोदवाड यांच्यामार्फत 30 मार्च रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. इंगवले याच्यावर भादवी कलम 307 विविध कलम, शस्त्रास्त्र, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार खडक पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याला मोक्का लागू होत नाही. तो गुन्हेगारी टोळीचा सदस्य नसून, टोळीप्रमुखाच्या बरोबर अन्य कोणतही गुन्हा त्याच्यावर दाखल नाही. त्याने शस्त्र वापरलेले नाही. समान भूमिका असलेल्या सहआरोपीला जामीन मिळाला आहे. तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ऍड. हर्षल सुनिल पाटील यांनी केली. खडक पोलिसात या प्रकरणात 29 नोव्हेंबर 2018 रोजी एफआयआर दाखल झाली आहे. फिर्यादीची बहिण क्लासला जात असताना तिची छेड काढल्याचा आरोप आहे. याबाबत तिने फिर्यादीला सांगितले. त्यावेळी फिर्यादीने बहिणीला त्रास देऊ नका, असे आरोपींना सांगितले. या कारणावरून डोक्यात बांबुने मारून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.