भुवनेश्वर – ओडिशाचे माजी आमदार जितेंद्र नाथ पटनायक यांच्या विविध कार्यालयांवर आणि निवासी जागेवर छापे टाकल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मुदत ठेवी जप्त केल्या आहेत. ईडीने गुरुवारी सांगितले की, जितेंद्र नाथ पटनायक यांचे नाव राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समोर आल्यानंतर त्यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यात ईडीने 133 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख आणि ठेवी जप्त केल्या आहेत.
राज्याच्या केओंझार जिल्ह्यातील जोडा येथे पटनायक आणि त्याच्याशी संलग्न संस्थांच्या विविध कार्यालयांवर आणि निवासी जागेवर छापे टाकून ईडीने ही कारवाई केली. पटनायक, ज्यांना जितू पटनायक म्हणूनही ओळखले जाते, ते चंपुवा विधानसभा मतदारसंघाचे माजी अपक्ष आमदार आहेत.
ईडीचा आरोप आहे की, जीतू यांनी आवश्यक वैधानिक मंजुरीशिवाय अवैध खाणकाम करून अवाजवी आर्थिक फायदा मिळवला आहे. ईडीने एका निवेदनात म्हटले आहे की, जीतू यांच्याशी संबंधित छापा कारवाईदरम्यान 70 लाख रुपयांची रोकड आणि 133.17 कोटी रुपयांच्या 124 एफडीच्या ठेवी जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच विविध आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेही जप्त करण्यात आले आहेत.
ओडिशा दक्षता कक्षाने पटनायक आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्रानंतर मनी लाँड्रिंग प्रकरण समोर आले आहे. राज्य दक्षता विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, आरोपींनी दीर्घकाळ अवैध उत्खनन करून सरकारी तिजोरीचे 130 कोटींहून अधिक नुकसान केले. ईडीला गुन्ह्याची जवळपास संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यश आले आहे, असेही ईडीने सादर केलेल्या निवेदनात त्यात म्हटले आहे.