नेवासा – हभप डाॅ. रविदासजी महाराज शिरसाठ यांनी लिहिलेल्या हरिपाठाच्या इंग्रजी आवृत्तीचे (Shri Dnyandev Haripath) प्रकाशन शांतिब्रम्ह मारोती महाराज कुऱ्हेकर आणि मुखेकर शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सर्व जीवांना आनंद देणारा असून या इंग्रजी आवृत्तीमुळे माऊलींचा हरिपाठ आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल असे, कुऱ्हेकर बाबा म्हणाले.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज प्रांगणात सुरु असलेल्या माऊलींच्या चरित्र भावामृत ज्ञानयज्ञ कथा सोहळ्यादरम्यान गुरुवारी (दि. 5) इंग्रजी हरिपाठ आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी महंत उद्धवजी महाराज, सुनिलगिरीजी महाराज, ऋषीनाथजी महाराज, संभाजीराव फाटके, पांडुरंग अभंग, गणेशानंदजी महाराज, खरात महाराज, शिवाजी आण्णा कटके आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. याकरिता सोहळा समिती अध्यक्ष संतोष काळे, सदस्य अनिल ताके, सुभाष मते, सुधीर चव्हाण, प्रवीण बोरकर, नानाभाऊ डोले, अमृत फिरोदिया, किशोर गारूळे यांनी परिश्रम घेतले.
“संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ सर्व जगाला व भावी पिढीला कळावा म्हणून माऊलींच्याच प्रेरणेने हा हरिपाठ इंग्रजीत अर्थासह भाषांतरित केला आहे.” – डाॅ. रविदास महाराज शिरसाठ