नेवासा – नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ( Ahmednagar – Sambhaji Nagar highway) मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्ड्यात आदळून अनेकांचे अपघात झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात असून, खड्डे न बुजविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारकांनी देण्यात आला आहे.
या महामार्गावरील खड्ड्यांमुळे एखाद्या नागरिकाचा अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वाहनधारकांच्या बैठकीत सर्वानुमते देण्यात आला. या महामार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली वाहनधारकांकडून सर्रास टोल घेऊन रस्त्याचे काम केले जात नाही.
रस्ता दुभाजकावर वळण असणारे दिशादर्शक फलक तुटल्यामुळे राञीच्यावेळी प्रवास करतांना वाहनाधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून, हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.महामार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील स्थानिक व्यावसायिकांनी रस्ते तोडून हॉटेलात येण्यासाठी अनाधिकृत रस्ता तयार केल्यामुळे रात्रीच्यावेळी अनेकदा अपघात होत आहेत.
याबाबत संबंधित ठेकेदार काहीच बोलत नाही आणि अधिकारीही कारवाई करत नाही. महामार्गाच्या रस्त्यावर वाट्टेल तसे रस्ते तोडले गेले असल्यामुळे दिवसेंदिवस अपघात मोठी वाढ होत आहे. या अपघाताला संबंधित ठेकेदार जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही वाहनधारकांनी केली आहे.