इंदापूर – इंदापूर तालुक्यातील सामान्य माणसाला मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात मी खंबीरपणे पाठीशी मामा म्हणून उभा असेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या, संजय गांधी निराधार योजना व पुरवठा शाखा यांच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना मधील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप व इंदापूर तालुक्यातील रास्त भाव दुकानांना गुणवत्ता धोरण व पुरवठा साखळी व्यवस्थापन धोरणाकामी आयएसओ 9001:2015 प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर, संजय गांधी निराधार योजनेचे सागर मिसाळ, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, नितीन शिंदे, दत्तात्रेय बाबर, सोमनाथ वाघमोडे, श्रीकांत बाब्रस यांच्यासह तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदीप गारटकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे सागर मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.