पिंपरी – शहरात मंगळवारी अक्षय्य तृतीयेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची अंदाजे 25 ते 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्याची माहिती प्रमुख सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. त्याशिवाय, इलेक्ट्रॉनिक साहित्य, वाहन खरेदी आदींनाही चांगला प्रतिसाद मिळाला.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दिवशी सोने खरेदी तसेच, वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. त्याशिवाय, इलेक्ट्रॉनिक साहित्यांची खरेदीही केली जात आहे. मात्र, त्याला तुलनेत कमी प्रतिसाद आहे. शहरात सुमारे 400 सराफ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांची आज दिवसभरातील उलाढाल अंदाजे 25 ते 30 कोटी रुपये इतकी झाली. गतवर्षी करोनाच्या निर्बंधामुळे कमी प्रतिसाद मिळाला होता.
सोन्याच्या दागिन्यांमध्ये प्रामुख्याने टेंपल व ऍन्टीक ज्वेलरी यांना मागणी होती. त्याशिवाय, अंगठी, सोनसाखळी, कर्णफुले आदी दागिन्यांची चांगली खरेदी करण्यात आली. सध्या लगीनसराई सुरू आहे. त्यातच अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त असल्याने सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा आजचा दर 51 हजार 600 रुपये इतका होता. तर, 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा आजचा दर 48 हजार 300 रुपये इतका होता. तर, चांदीचा दर 63 हजार 800 रुपये प्रति किलो इतका होता. चांदीच्या दागिन्यांमध्ये पायातले पैंजण यांना मागणी राहिली.
वाहन खरेदीला आज चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच वाहनचालकांनी आधीच दुचाकी व चारचाकी वाहनाचे “बुकींग’ करून ठेवले होते. तुलनेत इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीला कमी प्रतिसाद होता. सध्या उन्हाळा सुरू असल्याने प्रामुख्याने कुलर, फ्रीज आणि एसी आदींची खरेदी केली जात होती.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीमध्ये 50 ते 75 टक्के वाढ झाली आहे. टेंपल व ऍन्टीक ज्वेलरीला दिवसभरात चांगली मागणी होती. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी आवर्जून सोन्याची दागिन्यांची खरेदी केली जाते.
– दिलीप सोनिगरा, सराफ व्यावसायिक.
सोन्याच्या दरात वाढ-घट होत असली तरीही आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. गेली दोन वर्ष करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने सराफा बाजारावर मोठा परिणाम झाला होता. आज दिवसभरात सराफा बाजारात सुमारे 25 कोटी रुपयांची उलाढाल झाली.
– विलास भांबुर्डेकर, सराफ व्यावसायिक.