नवी दिल्ली- देशातील वीज उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी वाढीव कोळशाची मागणी केली असली तरी या कारखान्यांसाठी कोळसा पुरवठाही वाढवला जात आहे, असे सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीने म्हटले आहे.
वीज क्षेत्राला कोळशाचा पुरवठा 15.6 टक्क्यांनी वाढून तो 49.7 दशलक्ष टन इतका झाला आहे. येत्या काही महिन्यांत, विशेषत: पॉवर प्लांट्ससाठी कोळसा पुरवठ्यात आणखी वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही कोल इंडियाने म्हटले आहे.
कोल इंडियाचा देशांतर्गत कोळसा उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना याच कंपनीकडून सर्वाधिक कोळसा पुरवठा होतो. या कंपनीने एप्रिलमध्ये वीज केंद्रांना प्रतिदिन 1.66 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला होता जो गेल्या आठवड्यात वाढून 1.73 मेट्रिक टन इतका झाला आहे.