फक्त वीज कंपन्यांना कोळसा पुरवठा; औद्योगिक उत्पादनावर होणार परिणाम

नवी दिल्ली – देशात आणि परदेशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोळशाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे कोळसा कंपन्या फक्त वीज निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना काहीकाळ कोळसा पुरविणार आहेत.

ऍल्युमिनियम, सिमेंटसारख्या इतर क्षेत्रांचा कोळसा पुरवठा काही काळ स्थगित करण्यात आले असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात कोल इंडिया कंपनीची शाखा असलेल्या साउथ ईस्टर्न कोल फिल्ड या कंपनीने संबंधितांना पत्र पाठवले असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. कोल इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या कोळसा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मर्यादित काळासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

देशात विजेची गरज भागविली जावी याकरिता वीज प्रकल्पांना कोळसा कमी पडू दिला जाणार नाही. मात्र कोळसा वापरणाऱ्या इतर क्षेत्रांचा कोळसा पुरवठा काही का स्थगित करण्यात आला आहे. कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकदा परिस्थिती सुरळीत झाली की इतर क्षेत्रांचा कोळसा पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
करोनानंतर कोळशाची मागणी वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून वीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी जर कोळशाचा पुरेसा साठा केला असता तर सध्याची परिस्थिती निर्माण झाली नसती.

कोळसा कंपन्यांनी तशी विनंती वीज कंपन्यांना केली होती. मात्र वीज कंपन्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागतिक बाजारात बाजारात कोळशाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील वीज प्रकल्पांना आणि इतर उद्योगांना आयात करणे परवडत नाही. त्यामुळे देशातील कोळशाची मागणी वाढली आहे. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच राज्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे कोळसा उत्पादनाबरोबरच कोळसा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.