पुणे –केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल-डीझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करत आहेत, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी गुरुवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डीझेलवरील व्हॅट कमी करण्याच्या केलेल्या आवाहनाला उत्तर देताना जीएसटीचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या अज्ञानाचे पुन्हा दर्शन घडवले आहे, असेही मुळीक यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात पेट्रोलवर 32 रु. 15 पैसे इतका व्हॅट आकारला जातो. केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डीझेलवरील व्हॅट तातडीने कमी केला. इतर पक्षांच्या अखत्यारीतील राज्यांनी करांचे ओझे कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा होती. पण दारूवरील कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारने पंतप्रधानांचे आवाहन झुगारून राजकारण सुरूच ठेवले, आणि त्याचा थेट फटका नागरिकांना बसला. गेल्या सहा महिन्यांत या करांपोटी राज्य सरकारने तब्बल साडेतीन हजार कोटींचा महसूल कमावला आहे, असे मुळीक म्हणाले.
महाराष्ट्राने राज्यांतर्गत कर कमी केल्यास पेट्रोल-डीझेलचे भाव किमान दहा टक्क्यांनी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पण ठाकरे सरकारची ती इच्छा नाही. केंद्र सरकारशी संघर्ष करण्याच्या ठाकरे सरकारच्या खुमखुमीमुळे नागरिकांना वेठीस धरले जात आहे, असा आरोपही मुळीक यांनी केला आहे.