बारामती -यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुरूवारी (दि.28) बारामतीत झाली. बारामतीचा पारा तब्बल 41 अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. उन्हाच्या तीव्रतेने दुपारी रस्ते ओस पडू लागले असून बाजारपेठेवरही उन्हाचा परिणाम जाणवू लागला आहे. शहरातील रस्ते प्रचंड उन्हाने तापत असल्याने रस्त्यावरुन प्रवास करताना उन्हाच्या झळा लोकांना भाजून काढत आहेत.
सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा बसत असून संध्याकाळी साडेसहा पर्यंत गरम झळा लोकांना त्रासदायक ठरत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे भाजीपाला विक्रेत्यांनाही सतत पाणी व भाज्या वाळून जाऊ नये या साठी कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दुपारी बाजारपेठेत फारसे ग्राहकच नसल्याने अनेक दुकानदार दुपारी काही वेळासाठी घरी जात आहेत. संध्याकाळी बारामतीत ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.