नवी दिल्ली – अगोदरच विमानाचे इंधन महाग असल्यामुळे विमान कंपन्या विमान तिकिटाच्या दरात वाढ करण्याबाबत विचार करीत असतांनाच आता पुन्हा भारतातील तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधनाच्या दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे विमान प्रवास महागण्याची शक्यता वाढली आहे.
तेल कंपन्यानी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी विमानाच्या इंधनाच्या दरांमध्ये पुन्हा 0.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आता विमानाचे इंधन 113 रुपये 20 पैसे प्रति लिटर या पातळीवर गेले आहे.
भारतातील तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 व 16 तारखेला विमानाच्या इंधनाच्या दराचा आढावा घेतात. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा दररोज आढावा घेतला जातो. 16 मार्च रोजी इंधनाच्या दरात 18.3 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 1 एप्रिल रोजी पुन्हा इंधनाच्या दरात दोन टक्के वाढ करण्यात आली होती. आता त्यात आणखी 0.2 टक्के वाढ करण्यात आली आहे.
अगोदरच भारतामध्ये इंधनाच्या किमती वाढविला जात असतानाच रशिया युक्रेन युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरपेक्षा जास्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकारला इंधनाच्या दरात वाढ करावी लागत आहे. मात्र नागरिकांमध्ये यामुळे असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार इंधनावरील कर कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करू शकते.
पेट्रोल -डिझेल दरवाढ नाही
दरम्यान तेल कंपन्यांनी गेल्या दहा दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे टाळले आहे. त्या अगोदर पेट्रोल आणि डिझेलच्या घरांमध्ये दहा रुपयाची वाढ टप्प्याटप्प्याने करण्यात आली होती. अजूनही पेट्रोलच्या उत्पादन आणि विक्री खर्चात तफावत असून आगामी काळामध्ये पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे विश्लेषकांना वाटते.