मंचर/शिक्रापूर – पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथील मोबाइल दुकान फोडणारे आणि चोरीचे मोबाइल घेणारे अशा तिघांना शिरोली फाटा (ता. खेड) येथे पुणे ग्रामीण पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून 3 लाख 4 हजार 721 रुपये किमतीचे तब्बल 123 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.
निखील विजय पलांडे (वय 26), सचिन आत्माराम मोहिते (वय 33, दोघे रा. मुखई) व अमन मुकेश अग्रवाल (रा. शिक्रापूर) अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी शशिकांत जयराम लोखंडे (वय 37, रा. पारगाव शिंगवे) यांनी फिर्याद दिली होती. याबाबतची माहिती अशी, दि. 29 ते 30 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास लोखंडे यांच्या पारगाव येथील ओम एंटरप्राइजेस या मोबाइल शॉपीचा पत्रा उचकटून दुकानामध्ये प्रवेश करून दुकानांमध्ये असलेले विविध कंपन्यांचे मोबाइल चोरीस गेले होते.
गुन्हे शाखेचे पथक तपास करत असताना अशाच प्रकारचे गुन्हे खेड, शिक्रापूर या भागात यापूर्वी झाल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. गोपनीय बातमीदार मार्फत महिती मिळाली की, शिरोली फाटा राजगुरूनगर येथे निखील पलांडे व सचिन मोहिते हे काही काम धंदा करत नसून त्यांच्याकडे नवीन मोबाइलविक्रीसाठी आहेत व ते आज रोजी शिरोली फाटा येथे नवीन मोबाइलघेऊन विक्री करण्यासाठी येणार आहेत.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरोली फाटा राजगुरुनगर येथे जाऊन सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. एकाच्या पाठीवर काळ्या रंगाची मोठी बॅग मिळून आली. त्यामध्ये विविध कंपन्यांचे नवीन मोबाइल मिळून आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पारगाव शिंगवे येथील ओम एंटरप्रायजेस या मोबाइल शॉपीमधून चोरल्याची कबुली दिली.
शिक्रापूरमध्ये विक्री
खेड व शिक्रापूर येथील मोबाइल शॉपीमध्येही त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. यातील काही मोबाइलत्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौक, हिवरे रोड येथे राहणारा अमन मुकेश अग्रवाल याला विकले असल्याची कबुली दिली. त्यानुसार अमन मुकेश अग्रवाल याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये वरील ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले.