श्रीगोंदा – बाळासाहेब नाहाटा यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्य बाजार समिती महासंघाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व त्यांचे पती अतुल लोखंडे यांनी मंगळवारी (दि.12) त्यांच्या “लग्न वाढदिवशी’ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.
कृष्णकन्हैया डेअरीचे अध्यक्ष अतुल लोखंडे म्हणाले, नाहाटा हे कधीच कोणत्याही पक्षाशी पक्षनिष्ठा राहिलेले नाहीत. त्यांनी नेहमीच पक्षनिष्ठा खुंटीला टांगून स्वहिताचे राजकारण केले आहे. विधानसभा, पंचायत समितीची उपसभापती निवड तसेच नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात त्यांनी रान पेटविण्याचे काम केले. नाहाटा हे जिल्ह्याच्या राजकारणात विखे कुटुंबाचे नेतृत्व मानतात. तालुक्याच्या राजकारणात कधी आ. पाचपुते तर कधी जगताप अशी सोयीची भूमिका घेतात. ते कधीच कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नसून त्यांचे राजकारण नेहमीच “फिरते’ राहिले आहे.
त्यामुळे नाहाटांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून संधी देण्यापूर्वी वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. स्थानिक नेत्यांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन वरिष्ठांकडे वास्तव मांडायला हवे होते. परंतु, कोणालाही विचारात न घेता निर्णय लादले जाणार असतील तर पक्षातील लोकशाही संपुष्टात आली असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल, असे परखड मत अतुल लोखंडे यांनी मांडले. नाहाटा यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत कशी प्रवेश केला, असा सवालही उपस्थित केला आहे.
लोखंडे पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आमच्या मनात मोठा आदर होता, आहे व तो कायम राहील. परंतु, पक्षाने “दलबदलू’ नेत्याला संधी दिल्याने व्यथित होत आपण पत्नी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांच्यासह पक्षाबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
लोखंडे यांच्या निर्णयाने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून त्यांची मते घेऊन् वरिष्ठांशी चर्चा करण्याचे आश्वासन अतुल लोखंडे यांना दिले आहे.
नगर दक्षिणच्या लोकसभा निवडणूकीत खुद्द शरद पवार यांनी विशेष लक्ष घालून ती प्रतिष्ठेची केली होती. त्या निवडणुकीत देखील नाहाटा यांनी उघडपणे “पवारविरोधी’ भूमिका घेत भाजप उमेदवाराला साथ दिली होती. अशा नेत्याला पक्षाकडून मिळालेली संधी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खटकणारी आहे.
कल्याणी लोखंडे, पंचायत समिती सदस्या.