मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेली अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. सरकारला हा विषय नीट हाताळता आला नाही. आतापर्यंतच्या इतिहासात ज्येष्ठ नेत्याच्या घरी हल्ला झाला नव्हता. सरकारने आणि संबंधित मंत्र्यांनी हा विषय हाताळायला हवा होता. मात्र तसे झाले नाही, पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारविरोधात निषेध व्यक्त करत होत्या.