पुणे – “हेरोईन’ हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणात महिलेला तीन वर्ष, दोन महिन्याच्या कालावधीनंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. महिन्याच्या पहिल्या शनिवारी संबंधित पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर हा निकाल दिला आहे.
सुनीता श्रवण वायदंडे (रा. गुलटेकडी) असे तिचे नाव आहे. तिने ऍड. हर्षल सुनील पाटील आणि ऍड. पीयुष तोष्णीवाल यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. 22 किलो 550 ग्रॅम गांज्या बाळगल्याच्या आरोपावरून स्वारगेट पोलिसांनी 31 ऑगस्ट 2018 रोजी या प्रकरणात एकाला अटक केली. त्याच प्रकरणात वायदंडे हिला 13 फेब्रुवारी 2019 रोजी अटक करण्यात आली.
एनडीपीएस कलम 8, 21, 27 आणि 29 नुसार गुन्हा दाखल केला. तिची पूर्वीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली असल्याच्या प्रती बचाव पक्षाने न्यायालयात दाखल केल्या. तिला जामीन देण्याची मागणी करण्यात आली. हेरोईन जप्तीचे प्रमाण व्यावसायिक प्रमाणापेक्षा कमी असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.