मुंबई – संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी चप्पला फेकल्या तसेच घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने चर्चेचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. सांविधानिक मार्गाने तसेच संवादाच्या माध्यमातून त्यांनी आपले प्रश्न समोर मांडावेत. आंदोलनाला अनिष्ट वळण देऊन कर्मचाऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, अस आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
नेमकं काय घडलं?
अनेक संपकरी ST कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला. पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही.