नवी दिल्ली : राज्यात सत्ताधारी आणि विरोधक संघर्ष सुरु असतानाच दिल्लीत मोठ्या भेटीगाठींना सुरुवात झाल्याचे पहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पवार आणि मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीमुळे राज्यासहित दिल्लीतील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तर भाजपनेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे केंद्रीय यंत्रणांची चौकशी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री कारागृहात आहे. महाविकास आघाडीचे दूत संजय राऊत यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीची दाहकता लक्षात डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली असावी, असं दरेकर यांनी म्हटलं. .
तथापि, मोदींनी एखादी भूमिका घेतली की, ते शेवटपर्यंत ठाम राहतात. वास्तविक पाहता, शरद पवारांच्या भेटीचा अंदाज कोणालाही सहजासहजी येत नाही, असंही त्यांनी नमूद केलं.