नवी दिल्ली – भारताचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम आणि विद्यामान गृहमंत्री अमित शाह यांच्यातील संघर्ष संपूर्ण देशाने अनुभवला आहे. या संघर्षानंतर दोघे संसदेत एकमेकांसमोर आले. तो क्षण फोटोमध्ये कैद झाला. या फोटोमुळे राजकीय संघर्षानंतर राजकीय सामंजस्य कसं असावं हे अधोरेखित झालं.
अनेकदा आपण म्हणतो, पृथ्वी गोल आहे. जिथून सुरुवात झाली तिथेच शेवट होतो. राजकारण देखील त्याला अपवाद नाही. माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी जे काही घडलं, तेच 10 वर्षांपूर्वी विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबतीत घडले होतं.
पी. चिदंबरम हे यूपीए सरकारच्या काळात 2008 ते 2012 या कालावधीत देशाचे गृहमंत्री होते. त्याचवेळी 22 जुलै 2010 रोजी अमित शहा यांना सोहराबुद्दीन प्रकरणात अटक करण्यात आली होती.
आता अमित शहा गृहमंत्री आहेत. याच कालावधीत चिदंबरम यांना कारागृहाची हवा खावी लागली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चिदंबरम यांना सीबीआयच्या त्याच मुख्यालयात ठेवण्यात आलं होतं, ज्या मुख्यालयाचं त्यांनी गृहमंत्री असताना उद्घाटन केले होते.
सुमारे 10 वर्षांपूर्वी अशाच केंद्रीय संस्था अमित शहांच्या मागे होत्या. त्यांना दहा वर्षांपूर्वी अटक करून तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. शिवाय दोन वर्षे गुजरातबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ते 2015 मध्ये निर्दोष मुक्त झाले.
दरम्यान अमित शाह जवळपास तीन महिने तुरुंगात होते. तर चिदंबरम यांना तब्बल 105 दिवस कारागृहात काढवे लागले. चिदंबरम यांना अधिकचे 15 दिवस कारागृहात काढवे लागले. याला सव्याज परतावा, असंही राजकीय वर्तुळात गंमतीने बोललं जातं.
आज संसदेत दोन्ही दिग्गज नेते समोरासमोर आले. यावेळी त्यांनी एकमेकांना नमस्कार करून आपलं मार्गक्रमण केलं.