मुंबई – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शुक्रवारी आयएनएस वलसुराला प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज प्रदान केला. ‘निशान अधिकारी’ लेफ्टनंट अरुण सिंग संब्याल यांनी दिमाखदार संचलनात राष्ट्रपती ध्वज स्वीकारला. यावेळी राष्ट्रपतींना 150 जणांच्या तुकडीने मानवंदना दिली. आयएनएस वलसुराचे 800 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नौदलाच्या बॅंडच्या तालावर संचलन केले.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार, व्हाईस ऍडमिरल एमए हम्पीहोली, सदर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, आणि इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी या वेळी उपस्थित होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 मध्ये भारतीय नौदलाची लढाऊ ताकद वाढवण्यासाठी प्रगत टॉर्पेडो प्रशिक्षण सुविधा निर्माण करणे गरजेचे होते, तेव्हा आयएनएस वलसुराला नौदलाच्या सेवेत सामील करून घेण्यात आले होते. भारत प्रजासत्ताक बनल्यानंतर, 1 जुलै 1950 रोजी तुकडीचे नाव बदलून आयएनएस वलसुरा असे करण्यात आले.
त्यानंतर, आयएनएस वलसुराने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांनुसार उत्तम प्रगती केली आहे. सौराष्ट्रमध्ये सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून, आयएनएस वलसुराने अनेक कल्याणकारी उपाययोजना केल्या आहेत.