पिरंगुट -पिरंगुट घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला. चार वाहनांना धडकून ट्रक घाट संपल्यानंतर उलटला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. या अपघातात लवळे – राऊतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मृत झाले असून त्यांच्या पत्नी तसेच अन्य दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले.
युवराज संभाजी बोरूळे (वय 40 रा. भुकूम) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोपान सुदाम शिंदे यांनी फिर्याद दिली. यावरून गोरेलाल मंगलप्रसाद कोरी (रा. मध्यप्रदेश) या ट्रकचालकास ताब्यात घेण्यात आले आहे. आज (मंगळवारी) सकाळी दहाच्या सुमारास पुण्याकडून पिरंगुटच्या दिशेने ट्रक (एमएच 04 जीसी 3577) येत होता. दरम्यान चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सुरुवातीला त्याने एका दुचाकीला (एमएच 12 एस इ 2708) व चार चाकीला मागून टक्कर दिली.
सुदैवाने ही चारचाकी व त्यातील खुबवली येथील भायगुडे पती-पत्नी व त्यांची छोटीशी नात वाचले. त्यानंतर पिरंगुट घाट संपतो व नवीन रस्ताही संपतो त्याठिकाणी या बेधुंद ट्रकने समोरून येणाऱ्या ऍक्टिवा दुचाकीला टक्कर दिली. त्यात त्या दुचाकीवर असलेले आतिष वाघमारे, आकाश कांबळे व तुषार आडसूळ हे जखमी झाले. यातील एकजण लहान मूल असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. तसेच त्यांच्या मागेच होंडा दुचाकीवर असलेले रिहे येथील प्रशांत शिंदे यांची दुचाकीही ट्रक खाली आली.
परंतु शिंदे बाजूला फेकले गेल्याने सुदैवाने वाचले. त्यानंतर या ट्रक चालकाचा पूर्ण ताबा सुटल्याने व त्याने अर्जंट ब्रेक लावल्याने हा ट्रक समोर जाऊन उलटला. या ट्रकचा जोराचा धक्का समोर या दुचाकीवरून जाणारे बोरूळे या शिक्षक दाम्पत्याला लागला. गाडीचा चक्काचूर झाला तसेच बोरूळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना व त्यांच्या पत्नीला दीनानाथ रुग्णालयात हलविण्यात आले. दुर्दैवाने युवराज बोरूळे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पत्नी या जखमी असून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य तीन जखमींना सिम्बॉयसिस येथे दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान पौड पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक निरीक्षक विनायक देवकर, रमेश गायकवाड, पवन चौधरी, नितीन गार्डी, सिद्धेश पाटील, राजेश गायकवाड, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे, पिरंगुटचे उपसरपंच राहुल पवळे, शिवसेना नेते आबासाहेब शेळके, पोलीस मित्र मनोज पवळे, विजय पवळे, किरण गोळे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत.