चंदीगड – दिवंगत क्रांतीकारक शहीद भगतसिंग यांच्या हौतात्म्य दिनी 23 मार्च रोजी पंजाब सरकारने राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घोषणा केली आहे. भगतसिंग, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि पहिले शीख शासक महाराजा रणजित सिंग यांचे पुतळे विधानसभेत बसवण्याचा ठरावही आज पंजाब विधानसभेच्या सभागृहाने मंजूर केला.
विधानसभा अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी, मान यांनी ही घोषणा केली. या प्रस्तावावर बोलताना कॉंग्रेसचे आमदार अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी सांगितले की राज्य सरकारने भगतसिंग यांच्या स्मृती दिनी सुट्टी जाहीर करण्या ऐवजी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना भगतसिंग यांचे जीवन आणि बलिदान या विषयी माहिती देऊन त्यांच्या विषयी लोक मानसात आदर भावना वृद्धींगत करण्यास मदत करावी.