पुणे –महापालिकेच्या मिळकती भाडेकराराने देण्यासाठी महापालिकेची जागा वाटपाची स्वतंत्र नियमावली असतानाही; महापालिकेची मुदत संपताना जाता जाता सर्वपक्षीय नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी शहरातील नगरसेवकांशी संबंधित संस्थांना तब्बल 75 जागा नाममात्र दराने वाटप केल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या शेवटच्या मुख्यसभेत ही जागावाटपांची खैरात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने केली आहे.
महापालिकेने सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, बचत गट, सेवाभावी संस्था, मंडळे यांना महापालिकेच्या मिळकती नाममात्र दरात देण्यात आल्या आहेत.
आपल्या प्रभागातील एखाद्या सामाजिक संस्थेला महापालिकेच्या मालकीच्या मिळकती, गाळे, जलतरण तलाव, मैदाने, बहुउद्देशीय सभागृह तीन वर्षे कालावधीसाठी नाममात्र दराने देण्याबाबतचे साधारणत: प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवले होते.
यामध्ये सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांचे प्रस्ताव अधिक असले तरी सर्वपक्षीय नगरसेवकांनीही आपले प्रस्ताव या शेवटच्या टप्प्यात मान्यतेसाठी ठेवले होते. या सर्व प्रस्तावांना सत्ताधारी पक्षाकडून एकापाठोपाठ एक पुकारून तातडीने मान्यता देण्यात येत होती.
जागा वाटप नियमावलीचा विसर
महापालिकेच्या जागा नाममात्र दराने घेऊन त्या भाडेकराने देत त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने 2008 मध्ये जागा वाटप नियामवली तयार केली असून राज्य शासनाने त्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार, निविदा काढूनच पालिकेच्या बांधिव मिळकती देणे अभिप्रेत आहे. मात्र, अनेक संस्थांना महापालिकेचा संयुक्त प्रकल्प दाखवून अथवा तरतूदीमधील त्रुटींचा आधार घेत या जागा मुख्यसभेत देण्यात आल्या आहेत.