जुन्नर -महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जुन्नरमध्ये आगमन झाले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतासाठी जुन्नर शहराच्या पूर्व वेशीजवळ हजारो नागरिक व शिवभक्त यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. पारंपरिक वाद्ये, ढोल- ताशाच्या गजरात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जुना अश्वारूढ पुतळा काढून त्याठिकाणी नवीन शिवजन्मभूमीला साजेसा पुतळा बसवावा, अशी जुन्नर शहरवासीयांची मागणी होती.
जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणांनी आसमंत निनादून सोडला होता. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, फेटे परिधान केलेले शिवभक्त लक्ष वेधून घेत होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, नगराध्यक्ष शाम पांडे, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, नगरसेवक भाऊ कुंभार, सर्व आजी- माजी नगरसेवक, शिवसेना युवा सेनेचे गणेश कवडे,
उद्योजक महेश शेळके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धनराज खोत, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत डोके, माजी नगरसेवक मधुकर काजळे, मराठा सेवा संघाचे रुपेश जगताप, उमर फाउंडेशन अध्यक्ष समद इनामदार व सदस्य, रामराज्य प्रतिष्ठान, बजरंग दल कार्यकर्ते, पदाधिकारी व हजारो शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते.
महिलांची संख्या लक्षणीय होती. फुगड्यांचा फेर महिलांनी धरला. संध्याकाळी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अजूनच उधाण आले होते. आमदार अतुल बेनके व नगराध्यक्ष शाम पांडे यांनीही मिरवणुकीमध्ये भैरवनाथ ढोल ताशा पथकामध्ये ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.
ब्रॉंझ धातूचा पुतळा चार टनाचा
पुणे येथील शिल्पकार निलेश खेडकर यांनी शिवरायांच्या शिल्पाचे काम केले. ब्रॉंझ धातूच्या पुतळ्याची उंची ही 17 फुट असून वजन 4 टन आहे. जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता. लायन्स क्लब, शिवाई देवी यात्रा कमिटीने शिवभक्तांना लाडूचे वाटप केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर मंत्रीगण यांच्या उपस्थितीमध्ये येत्या दहा ते पंधरा दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले जाईल. याप्रसंगी महाराष्ट्रातून लाखो शिवभक्त जुन्नरमध्ये येतील.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर.